मुलांना शाळेतील पुस्तकांच्या वाचनाबरोबर अवांतर वाचन देखील खूप आवडत असते.लहान वयात गोष्टी,गाणी,कविता ऐकायची आणि वाचायची सवय मुलांना लावली तर मुलांच्या भाषेचा विकास सहज व सोप्या पद्धतीने होऊ शकतो. मुलांमध्ये वाचनाचे कौशल्य विकसीत करण्यासाठी अवांतर वाचनाची सवय ही वर्तमानपत्राच्या वाचनातून विकसीत करणे ही फायदेशीर गोष्ट ठरू शकते.
श्री.विकास काटकर यांनी सोलापूर येथील आपल्या शाळेत कार्यानुभवाच्या तासाला मुलांच्या मदतीने ज्ञानगंगा नावाचा उपक्रम राबवला.यात प्रामुख्याने वर्तमानपत्राचे वाचन हा महत्वाचा कार्यक्रम त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने पार पाडून मुलांमध्ये वाचनाची आवड जोपासली.शाळेत येणाऱ्या वर्तमानपत्रामधील महत्वाच्या विषयांची कात्रणे काढून मुलांच्या मदतीने कार्यानुभवाच्या तासाला ही कात्रणे त्यांनी एका वहीत चिकटवून घेतली.यातून एक छोटेसे वाचनालय तयार झाले व मुले पण आपल्या घरी येणारी वर्तमानपत्रे काळजीने वाचू लागली. त्यात त्यांना चांगली माहिती मिळाली तसेच त्यातील महत्वाची कात्रणे काढून शाळेतल्या वहीत चिकटवू लागली.या वर्तमानपत्रात आलेल्या कथांमधून काही कथा वाचून पाठ करून परीपाठाच्या वेळी सांगू लागली. त्यातून त्यांचा वाचनाचा छंदही वाढला.मुलांमध्ये मनोरंजनातून भाषाविकास करण्यासाठी काटकरांनी विनोद स्पर्धा आयोजित केली. वर्तमानपत्रातून आलेले विनोद मुलेया स्पर्धेत सांगू लागली.
वर्तमानपत्रातील सांगा पाहू? ओळखा पाहू?जरा डोके चालवा अशा कोड्यांच्या वापराने मुलांचे सामान्यज्ञान वाढते तर आरोग्य या सदराचा उपयोग शारिरीक शिक्षण, आरोग्य, आहार यासाठी खूप चांगल्या प्रकारे होतो.दिनविशेष हे सदर वर्षभरातील थोर पुरुषांची जयंती,पुण्यतिथी समजून कार्यक्रम साजरा करायला खूप उपयोगी पडते.संस्कारधन, विज्ञानसंस्कार,थोरांचे बोल याचा देखील चांगला फायदा होतो.शिष्यवृत्तीच्या परीक्षेला बसलेल्या मुलांना देखील या उपक्रमाचा लाभ चांगल्या प्रकारे होतो. शब्दकोडी सोडवल्याने शब्दसंपत्ती व सामान्यज्ञानात भर पडते.अशा प्रकारे वर्तमानपत्राद्वारे मुलांचा हसतखेळत भाषिक विकास सहज सुलभ साधता येतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा प्रतिक्रीया / अभिप्राय लिहा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.