गुरुवार, २ एप्रिल, २०१५

श्रीविठ्ठलच्या आरत्या Shree Vitthalachya Aartya

(१)
युगें अठ्ठावीस विटेवरी उभा । वामांगीं रखुमाई दिसे दिव्य शोभा ॥ पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा । चरणीं वाहे भीमा उद्धरी जगा ॥ १ ॥ जय देव जय देव जय पांडुरंगा । रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावें जिवलगा ॥ ध्रु० ॥ तुळसीमाळा गळां कर ठेवुनि कटीं । कांसे पीतांबर कस्तुरि लल्लाटीं ॥ देव सुरवर नित्य येती भेटी । गरुड हनुमंत पुढें उभे रहाती ॥ जय० ॥ २ ॥ धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा । सुवर्णाची कमळें वनमाळा गळां ॥ राई-रखुमाबाई राणीया सकळां । ओंवाळीती राजा विठोबा सांवळा ॥ जय० ॥ ३ ॥ ओंवाळूं आरत्या कुरवंड्या येती । चंद्रभागेमाजीं सोडुनियां देती ॥ दिंड्या पताका वैष्णव नाचती । पंढरीचा महिमा वर्णाचा किती ॥ जय० ॥ ४ ॥ आषाढी कार्तिकी भक्तजन येती । चंद्रभागेमध्ये स्नानें जे करिती ॥ दर्शनहेळामात्रें तयां होय मुक्ती । केशवासी नामदेव भावें ओंवाळीती ॥ जय० ॥ ५ ॥

(२)
येई हो विठ्ठले माझे माउली ये । निढळावरी कर ठेवुनि वाट मी पाहें ॥ ध्रु० ॥ आलिया गेलिया हातीं धाडी निरोप । पंढरपुरीं आहे माझा मायबाप ॥ येई० ॥ १ ॥ पिवळा पीतांबर कैसा गगनीं झळकला । गरुडावरि बैसोनि माझा कैवारी आला ॥ येई० ॥ २ ॥ विठोबाचे राज्य आम्हां नित्य दिपवाळी । विष्णुदास नामा जीवें भावें ओंवाळी ॥ येई हो० ॥ ३ ॥

(३) 
ओंवाळूं आरती माझ्या पंढरीराया, माझ्या पंढरीमाया ॥ सर्वभावे शरण आलों तूझिया पायां ॥ ध्रु० ॥ सर्व व्यापुनि कैसें रूप राहिलें अकळ, रूप राहिलें अकळ ॥ तो हा गवळ्याघरी झाला कृष्ण गोपाळ ॥ ओंवाळूं ० ॥ १ ॥ निजस्वरूप गुणातीत अवतार धरीं अवतार धरी ॥ तो हा पांडुरंग उभा विटेवरी ॥ ओंवाळूं० ॥ २ ॥ भक्तांच्या काजा कैसा रूपासी आला, कैसा रूपासी आला । ब्रीदाचा तोडरू चरणीं मिरविला ॥ ओंवाळूं० ॥ ३ ॥ आरति आरति कैसा ओंवाळीली, कैसी ओंवाळीली ॥ वाखाणितां कीर्ति वाचा परतली ॥ ओंवाळूं० ॥ ४ ॥ भावभक्तीबळे होसी कृपाळू देवा, होसी कृपाळू देवा ॥ तुका म्हणे तुझ्या न कळता मावा ॥ ओंवाळूं० ॥ ५ ॥

(४)
आरती अनंतभुजा ॥ विठो पंढरीराजा ॥ न चालती उपचार ॥ मनें सारिली पूजा ॥ आरती० ॥ ध्रु० ॥ परेस पार नाहीं ॥ न पडे निगमा ठायीं ॥ भुलला भक्तीभावें ॥ लाहो घेतला देहीं ॥ आरती० ॥ २ ॥ अनिर्वाच्य शुद्धबुद्ध ॥ उभा राहिला नीट ॥ रामा जनार्दनीं ॥ पायीं जोडली वीट ॥ आरती० ॥ ३ ॥

(५)
संत सनकादिक भक्त मिळाले अनेक ॥ स्वानंदें गर्जती पाहूं आले कौतुक ॥ १ ॥ नवल होताहे आरती देवाधिदेवा ॥ स्वर्गीहूनि सुरवर पाहूं येताति भावा ॥ ध्रु० ॥ नरनारी तटस्थ अवघे पडले नयना ॥ ओंवाळितां श्रीमुख धणी न पुरे मना ॥ नवल० ॥ २ ॥ एका जनार्दनीं मंगल कौतुकें गाती ॥ मंगल आरत्या गाती ॥ मिळाले वैष्णव जयजयकारें गर्जती ॥ नवल० ॥ ३ ॥

 

Popular Posts

शासन सेवेतील अधिकारी व कर्मचारी सेवाजेष्ठता सूची प्रत्येक वर्षी तयार करणे व प्रसिद्ध करणे याबाबतचे सर्वंकष धोरण

 शासन सेवेतील अधिकारी व कर्मचारी सेवाजेष्ठता सूची प्रत्येक वर्षी तयार करणे व प्रसिद्ध करणे याबाबतचे सर्वंकष धोरण  DOWNLOAD