(१)
लवधवती विक्राळा ब्रह्मांडी माळा । वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥ लावण्यसुंदर मस्तकीं बाळा । तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ १ ॥ जय देव जय देव जय श्रीशंकरा । आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥ कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा । अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥ विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा । ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव० ॥ २ ॥ देवीं दैत्यीं सागरमंथन पैअं केलें । त्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें ॥ तें त्वां असुरपणें प्राशन केलें । नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥ जय देव० ॥ ३ ॥ व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी । पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥ शतकोटीचें बीज वाचे उच्चारी । रघुकुलतिलक रामदासा अंतरीं ॥ जय देव जय देव० ॥ ४ ॥
(२)
(श्रीत्र्यंबकेश्वराची आरती )
जय जय त्र्यंबकराज गिरिजानाचा गंगाधरा हो ॥ त्रिशूलपाणी शंभो नीलग्रीचा शशिशेखरा हो ॥ वृषभारूढ फणिभुषण दशभुज पंचानन शंकरा हो ॥ विभूतिमाळा जटा सुंदर गजचर्मांबरधरा हो ॥ ध्रु० ॥ पडलें गोहत्येचें पातक गौतमऋषिच्या शिरीं हो ॥ त्यानें तप मांडिलें ध्याना आणुनि तुज अंतरीं हो ॥ प्रसन्न होउनि त्यातें स्नाना दिधली गोदावरी हो ॥ औदुंबरमुळिं प्रगटे पावन त्रैलोक्यातें करी हो ॥ जय० ॥ १ ॥ धन्य कुशावर्ताचा महिमा वाचे वर्णूं किती हो । आणिकही बहु तीर्थें गंगाद्वारादिक पर्वतीं हो ॥ वंदन मार्जन करिती त्यांचे महादोष नासती हो ॥ तुझिया दर्शनमात्रें प्राणी मुक्तीतें पावती हो ॥ जय० ॥ २ ॥ ब्रह्मगिरीची भावें ज्याला प्रदक्षिणा जरि घडे हो ॥ तैं तैं काया कष्टे जंव जंव चरणीं रुपती खडे हो ॥ तंव तंव पुण्य विशेष किल्मिष अवघें त्यांचें झडे हो ॥ केवळ तो शिवरूपी काळ त्याच्या पायां पडे हो ॥ जय० ॥ ३ ॥ लावुनियां निजभजनीं सकळहि पुरविसि मनकामना हो ॥ संतति संपति देसी अंतीं चुकविसि यमयातना हो ॥ शिव शिव नाम जपतां वाटे आनंद माझ्या मना हो ॥ गोसावीनंदन विसरे संसारयातना हो ॥ जय जय० ॥ ४ ॥
(३)
जय जय शिव हर शंकर जय गिरिजारमणा ॥ पंचवदन जय त्र्यंबक त्रिपुरासुरदहना ॥ भवभयभंजन सुंदर स्मरहर सुखसदना ॥ अविकल ब्रह्म निरामय जय जगदुद्धरणा ॥ १ ॥ जय देव जय देव जय शंकर सांबा ॥ ओंवाळित निजभावें, नमितों मी सद्भावें वर सहजगदंबा ॥ ध्रु० ॥ जगदंकुरवरबीजा सन्मय सुखनीजा ॥ सर्व चराचर व्यापक जगजीवनराजा ॥ प्रार्थित करुणावचनें जय वृषभध्वजा ॥ हर हर सर्वहि माया नमितों पदकंजा ॥ जय देव० ॥ २ ॥ गंगाधर गौरीवर जय गणपतिजनका ॥ भक्तजनप्रिय शंभो वंद्य तूं मुनिसनकां ॥ करुणाकर सुख्सागर जगनगिंच्या कनका । तव पद वंदित मौनी भवभ्रांतीहरका ॥ जय देव जय देव जय शंकरा सांबा ॥ ओंवाळित निजभावें, नमितों मी सद्भावें वर सहजगदंबा ॥ ३ ॥
(४)
कर्पूरगौरा गौरिशंकरा आरति करूं तुजला । नाम स्मरतां प्रसन्न होउनि पावसि भक्ताला ॥ श्रु० ॥ त्रिशूळ डमरू शोभत हस्तीं कंठिं रुंडमाळा । उग्रविषातें पिऊनी रक्षिसी देवां दिक्पाळां ॥ तृतीय नेत्रीं निघती क्रोधें प्रळयाग्नीज्वाळा । नमिती सुरमुनि तुजला ऐसा तूं शंकर भोळा ॥ १ ॥ ढवळा नंदी वाहनशोभे अर्धांगीं गौरी । जटा मुकुटीं वासकरितसे गंगासुंदरी ॥ सदया सगुणा गौरीरमणा मम संकट वारीं । मोरेश्वरसुत वासुदेव तुज स्मरतो अंतरीं ॥ २ ॥
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा प्रतिक्रीया / अभिप्राय लिहा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.