(१)
आरती आरती करूं गोपाळा । मीतूंपण सांडोनी वेळोवेळां ॥ ध्रु० ॥ आवडीं गंगाजळें देवा न्हाणिलें । भक्तींचे भूषण प्रेमसुगंध अर्पिलें ॥ अहं हा धूप जाळूं श्रीहरीपुढें । जंव जंव धूप जळे तंव तंव देवा आवडे ॥ आरती० ॥ १ ॥ रमावल्लभदासें अहंधूप जाळिला । एका आरतीचा मा प्रारंभ केला ॥ सोहं हा दीप ओंवाळूं गोविंदा । समाधी लागली पाहतां मुखारविंदा ॥ आरती० ॥ २ ॥ हरिखें हरीख होतो मुख पाहतां । प्रगटल्या ह्या नारी सर्वहि अवस्था ॥ सद्भावालागीं बहु हा देव भूकेला । रमावल्लभदासें अहं नैवेद्य अर्पिला ॥ आरती० ॥ ३ ॥ फल तांबूल दक्षिणा अर्पिली । तया उपरी नीरांजनें मांडिलीं ॥ पंचप्राण पंचज्योति आरति उजळली । विश्व हें लोपलें तया प्रकाशातळीं ॥ आरती० ॥ ४ ॥ आरतीप्रकाशें चंद्रसूर्य लोपले । सुरवर नभीं तेथें तटस्थ ठेले ॥ देवभक्तपण न दिसे कांहीं । ऐशापरी दास रमावल्लभा पायीं ॥ आरती० ॥ ५ ॥
(२)
नारायण खगवाहन चतुराननताता । स्मरअरितापविमोचन पयनिधिजामाता ॥ वैकुंठाधिपते तव महिमा मुखिं गातां । सहस्त्र मुखांचा तोही थकला अनंता ॥ १ ॥ जय देव जय देव जय लक्ष्मीकांता । मंगल आरति करितों भावें सुजनहिता ॥ ध्रु० ॥ सदैव लालन पालन विश्वाचें करिसी । दासांस्तव तूं नाना अवतार धरिसी ॥ दुष्टां मर्दुनि दुःखा भक्तांच्या हरिसी । निशिदिनीं षण्मुखतातातें हृदयीं स्मरसी ॥ जय० ॥ २ ॥ चपला सहस्त्र जयाच्या जडल्या वसनासीं । कोटिशशि क्षयविरहित शोभति वदनासी ॥ कौस्तुभमुगुटविराजित मूर्ती अविनाशी । ज्यातें हृदयीं ध्यातां भवभय अघ नाशी ॥ जय० ॥ ३ ॥ तारीं वारीं संकट मारी षड्रिपुला । स्मरती त्यांतें देइं संपत्ती विपुला ॥ तापत्रय जाळितसे निशिदिनिं मम वपुला । दास म्हणे वोसंगा घे बालक आपुला ॥ जय० ॥ ४ ॥
(३)
लक्ष्मीरमणा भवभयहरणा चित्सुखसदना हत्कमला । बहु प्रेमानें पंचारति ही करित असो बा तुज विमला ॥ ध्रु० ॥ दृढ भक्ती पाहुनियां दिधलें ध्रुवपद जैसें ध्रुवबाला । अर्जुनरथिं सारथ्य हि करुनि अवगाहीलें अश्वांला ॥ ऐकुनि ऐशा तव औदार्या आठवितो तव पदकमला । दृढ भक्तीनें रुक्मिणिसुत हा, देईं दर्शना तव विमला ॥ १ ॥
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा प्रतिक्रीया / अभिप्राय लिहा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.