गुरुवार, २ एप्रिल, २०१५

श्रीमहालक्ष्मीच्या आरत्या Shree Mahalaxmichya Aartya

(१)
ॐ नमो आद्यरूपे । देवी भगवती माते ॥ काळिका कामरूप । शक्ति तूं जगन्माते ॥ वैष्णवी भूतमाया । मूळपीठ देवते ॥ झालिया भेटी तूझी । नीवारिसी पापंतें ॥ १ ॥ जय श्रीकुलदेवते । महालक्ष्मी ग माते । आरती घेउनीयां । ओंवाळीन मी तूतें ॥ ध्रु० ॥ अंबिका भद्रकाली । देवी आद्या कुमारी मारिलें चंडमुंड । महिषासुर हे वैरी ॥ हर्षले देवद्विज । गाती जयजयकारी ॥ उजळुनी दीपमाळा । ओंवाळीती नरनारी ॥ जय० ॥ २ ॥ परिधान हेमवर्ण । कंठीं नवरत्नें हार ॥ करतळें रातोत्पळें । अद्भुत जयजयकार ॥ अवतार कोल्हापुरी । केला प्रताप थोर ॥ मारिले दैत्य बिकट । अघट कोल्हासुर ॥ जय० ॥ ३ ॥ नासिकीं मुक्ताफळ । रत्नकुंडलें श्रवणीं ॥ घवघवीत नेपुरें हो । अंदु वाजती चरणीं ॥ मस्तकीं पुष्पहार । दिसे भासे वदनीं ॥ पौर्णिमाचंद्रबिंब । पृष्ठीवरी रुळे वेणी ॥ जय० ॥ ४ ॥ नवकोटी कात्यायनी । चतुःषष्टी योगिनी ॥ भूचरां जलचरां । आई तुजपासुनी ॥ ऐसी तूं महालक्ष्मी जगताची जननी ॥ नामया विष्णुदासा । तुझें चिंतन ध्यानीं ॥ जय० ॥ ५ ॥

(२)
करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता । पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकांता ॥ कमलाकारें जठरीं जन्मविला धाता । सहस्त्रवदनीं भूधर न पुरे गुण गातां ॥ १ ॥ जय देवी जय देवी जय महालक्ष्मी । वससी व्यापकरूपें तूं स्थूलसूक्ष्मी ॥ ध्रु० ॥ मातुलिंग गदायुत खेटक रविकिरणी । झळके हाटकवाटी पीयुषरसपाणी ॥ माणिकदशना सुरंगवसना मृगनयनी । शशिधरवदना, राजस मदनाची जननी ॥ जय० ॥ २ ॥ तारा शक्ति अगम्या शिवभजकां गौरी । सांख्य म्हणती प्रकृति निर्गुण निर्धारीं ॥ गायत्री निजबीजा निगमागम सारी । प्रगटे पद्मावती निजधर्माचारी ॥ जय० ॥ ३ ॥ अमृतभरिते सरिते अघदुरितें वारीं । मारीं दुर्घट असुरां भव दुस्तर तारीं ॥ वारीं मायापटल प्रणमत परिवरीं । हें रूप चिद्रुप तद्रुप दावीं निर्धारीं ॥ जय० ॥ ४ ॥ चतुराननें कुत्सित कर्मांच्या ओळी । लिहिल्या असतिल माते माझे निजभाळीं । पुसोनि भरणातळी पदसुमनें क्षाळीं । मुक्तेश्वर नागर क्षीरसागरबाळी ॥ जय० ॥ ५ ॥

 

Popular Posts

शासन सेवेतील अधिकारी व कर्मचारी सेवाजेष्ठता सूची प्रत्येक वर्षी तयार करणे व प्रसिद्ध करणे याबाबतचे सर्वंकष धोरण

 शासन सेवेतील अधिकारी व कर्मचारी सेवाजेष्ठता सूची प्रत्येक वर्षी तयार करणे व प्रसिद्ध करणे याबाबतचे सर्वंकष धोरण  DOWNLOAD